हाडाचा कर्करोग दुर्मिळ असतो आणि हाडातील किंवा भोवतालच्या पेशींमुळे होऊ शकतो. या कर्करोगाच्या पेशी प्रारंभापासून उद्भवतात आणि हाड नष्ट करण्यासाठी आक्रमकपणे अनेक पट वाढत जातात. कर्करोगाच्या पेशी रक्ताभिसरणातून इतर अवयवांमध्ये पसरू शकतात, जसे की फुफ्फुसे आणि इतर हाडे व उती. या गाठींचे आकारमान वाढत जाते आणि कार्यात अडथळा निर्माण होऊन मृत्यू होऊ शकतो.
हाडाचा कर्करोग हा पेशींच्या उगमानुसार भिन्न प्रकारचा असतो. हाडाच्या सामान्य कर्करोगात समावेश होऊ शकतो:
अस्थीजन्य सारकोमा आणि इविंग्ज सारकोमा हे दोन्हीही ५ ते २० वर्षे वयाच्या मुलांमध्ये जास्त सामान्य आहेत.
मल्टिपल मायलोमा, कॉन्ड्रोसारकोमा यांसारखे कर्करोग प्रौढ वयात उशीरा किंवा वृद्धावस्थेत होण्याची जास्त शक्यता असते. स्तन, थायरॉईड, फुफ्फुसे इत्यादींसारख्या शरीराच्या कोणत्याही भागात उद्भवणारा कर्करोग दुय्यमरित्या हाडामध्ये पसरू शकतो आणि याला दुय्यम (किंवा मेटास्टॅटिक) हाडाचे कर्करोग म्हणतात.
हाडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये खालील लक्षणे दिसतात:
हाडाचा कर्करोग सहजपणे सापडत नाही आणि त्यामुळे निदानाला विलंब होतो. हे कर्करोग दुर्मिळ असल्यामुळे, लोकांमध्ये याबाबत योग्य जागरूकता नाही. हाडाच्या कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी त्याचे लवकरात लवकर निदान होणे अत्यावश्यक असल्यामुळे, संबंधित डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्यावा. अचूक निदानासाठी संपूर्ण तपासणी आणि योग्य तपासण्या आवश्यक आहेत. क्ष-किरण तपासणी, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, हाडाचे स्कॅन, पेट स्कॅन यांसारख्या तपासण्या कराव्या लागू शकतात. निदानाची पुष्टी करण्यासाठी उपचारकर्ता शल्यविशारदकांद्वारे केली जाणारी बायॉप्सी ही एक महत्त्वाची तपासणी आहे.
पूर्वी, हाडाचा कर्करोग बरा न होणारा मानला जात असे आणि रुग्णाला वेदनांपासून मुक्त करण्यासाठी विच्छेदन शस्त्रक्रियेसारख्या प्रक्रिया केल्या जात. या कर्करोगाच्या व्यवस्थापनामध्ये विविध प्रगती झाल्या आहेत. एमआरआय स्कॅन, पेट स्कॅन इत्यादींसारख्या उत्कृष्ठ नैदानिक पद्धतींमुळे निदान करणे आता सोपे झाले आहे. शरीराचा वरचा भाग, खालचा भाग आणि कटिप्रदेशाच्या कर्करोगांसाठी आता अवयव बचावाच्या विविध प्रक्रिया उपलब्ध झाल्या आहेत. मेगाप्रोस्थेटिक रिप्लेसमेंट, एलो बोन ग्राफ्ट, व्हस्क्युलराईज्ड फिब्युला, रोटेशनप्लास्टी इत्यादींसारखी अनेक पुर्नबांधणी तंत्रेही उपलब्ध आहेत. हाडाचा कर्करोग झालेल्या मुलांसाठी विस्तारण्यायोग्य मेगाप्रोथेसिस सारखी रोपणेही आता उपलब्ध आहेत.
मेटास्टॅटिक हाडाचा कर्करोग झालेल्या रुग्णांमध्ये, त्यांना कर्करोगाच्या वेदनांपासून आराम मिळावा आणि जीवनाचा दर्जा व कार्य सुधारावे यासाठी पॅलिएटिव शस्त्रक्रियाही (रोगाची तीव्रता कमी करणारी परंतु रोग बरा न करणारी शस्त्रक्रिया) केल्या जातात.
आता बहुआयामी दृष्टिकोनाची शिफारस केली जाते ज्यामध्ये केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि किरणोत्सर्गी उपचारांचा समावेश होतो. किमोथेरपीमुळे कर्करोगाच्या प्रसारास प्रतिबंध होतो आणि जीव वाचतो. शस्त्रक्रियेनंतर सहाय्यक उपचार म्हणून किरणोत्सर्गी उपचारांचा वापर केला जाऊ शकतो.
नवीन तंत्रज्ञान व कौशल्यांच्या आगमनामुळे हाडाच्या प्राथमिक कर्करोगांचे निदान लवकर होऊन ते बरे होऊ शकतात. बरे होण्याचा दर 25 % वरून 70 % पर्यंत सुधारला आहे. व्यापक स्थानिक आणि शरीराच्या एका भागातून दुसरीकडे पसरणारा आजार असलेल्या ज्या रुग्णांना उपचारांना उशीर होतो आणि ते बरे होणे शक्य नसते, तेव्हा त्यांच्या वेदना कमी करणे व कार्य सुधारणे या दृष्टीने उपचार केले जाऊ शकतात. अशाप्रकारे जीवनाचा दर्जा सुधारू शकतो.