हिपॅटायटीस सी बद्दल तुम्हाला हे माहीत असावे
हिपॅटायटीस सी हा सर्वात सामान्य संसर्गजन्य, रक्तात निर्माण होणारा विषाणूजन्य यकृताचा आजार आहे. तसेच, हिपॅटायटीस सी झालेल्या अनेकांना तो झाला आहे हेच माहीत नसते.
रक्ताचा रक्ताशी संपर्क आल्याने पसरणारा हा आजार, प्रामुख्याने टोचून घेण्याच्या मादक पदार्थांद्वारे पसरतो. हिपॅटायटीस ए आणि बी साठी लशीकरण उपलब्ध आहे, परंतु दुर्दैवाने, हिपॅटायटीस सी साठी नाही. संक्रमण टाळण्यासाठी हिपॅटायटीस सी विषाणूला (एचसीव्ही) उघड होणे टाळणे महत्त्वाचे आहे. या आजाराबाबत अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.
यकृत का महत्त्वाचे आहे?
शरीराचा सर्वात मोठा अंतर्गत अवयव असलेले यकृत जिवंत राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्याची अनेक महत्त्वाची कार्ये आहेत –
- ते पचनाला मदत करणारे पित्त, अर्थात रसायनांचे मिश्रण निर्माण करते.
- अन्नाचे पचन करून उर्जेत रूपांतर करण्यास मदत करते.
- रक्तातून धोकादायक पदार्थ काढून संक्रमणाशी लढण्यास मदत करते.
- रक्ताची गुठळी होण्यास महत्त्वाची असलेली रसायने तयार करते.
- लोह, जीवनसत्वे आणि इतर आवश्यक घटक साठवून ठेवते
हिपॅटायटीस सी काय आहे?
एचसीव्ही (हिपॅटायटीस सी विषाणू) मुळे होणाऱ्या यकृताच्या आजाराला हिपॅटायटीस सी म्हणतात. एचसीव्हीमुळे यकृताचा दाह होतो आणि त्याचे कार्य प्रतिबंधित होते. सहसा, एचसीव्हीमुळे यकृताचे जुनाट किंवा दीर्घकालीन संक्रमण होते. औषधोपचारांनी यशस्वीपणे उपचार न केल्यास, एचसीव्हीमुळे यकृतास व्रण पडू शकतात (सिऱ्हॉसिस), यकृत बंद पडू शकते आणि यकृताचा कर्करोग होऊ शकतो.
हिपॅटायटीस सी होण्याची जोखीम कोणाला असते?
एचसीव्हीचा प्रसार रक्ताचा रक्ताशी संपर्क आल्याने होतो. पुढील बाबतीत तुम्हाला जोखीम असू शकते –
- पूर्वी शिरेतून औषधोपचार घेतले असतील तसेच ही औषधे घेण्यासाठी इतरांनी वापरलेल्या सुया वापरल्या असतील
- पूर्वी रक्त द्यावे लागले असेल, विशेषतः अनियमीत रक्त पेढ्यांतून
- मूत्रपिंडाचा जुनाट आजार आहे आणि हिमोडायलिसिस चालू आहे
- संसर्ग झालेल्या सुया किंवा रक्ताशी संपर्क
- अनेक जोडीदारांसह असुरक्षित शारीरिक संबंध
- टॅटू करून घेतला आहे
कशामुळे हिपॅटायटीस सी होत नाही?
- खोकणे, आलिंगन देणे, शिंकणे किंवा किरकोळ संपर्कांतून एचसीव्हीचा प्रसार होत नाही
- भांडी, पाणी किंवा अन्न व पाणी पिण्याची भांडी वापरल्याने एचसीव्हीचा प्रसार होत नाही
हिपॅटायटीस सी चे दीर्घकालीन परिणाम काय आहेत?
२० ते ३० वर्षांमध्ये संथपणे हिपॅटायटीस सी यकृताचे नुकसान करतो. हिपॅटायटीस सी वर उपचार न केल्यास, त्यातून यकृताचा सिऱ्हॉसिस (यकृताला व्रण पडणे) निर्माण होऊ शकतो आणि हिपॅटायटीस सी वर उपचार न झालेल्या ५० टक्के रुग्णांमध्ये यकृताचा सिऱ्हॉसिस विकसीत होऊ शकतो. जर सिऱ्हॉसिस विकसीत झाला तर त्या रुग्णांचे यकृत बंद पडण्याची आणि सुमारे ५-१० टक्के रुग्णांमध्ये यकृताचा कर्करोग होण्याची जोखीम असते.
हिपॅटायटीस सी ची काय लक्षणे आहेत?
एचसीव्ही च्या प्रारंभीच्या टप्प्यात रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि निरोगी वाटते. जेव्हा हा आजार वाढून त्याचे यकृताच्या सिऱ्हॉसिसमध्ये रूपांतर होते तेव्हा थकवा, मळमळणे, भूक न लागणे, त्वचेवर खाज सुटणे, गडद लघवी आणि कावीळ (त्वचा व डोळे पिवळे होणे) यांसारखी लक्षणे दिसू लागतात. एकदा का यकृत बंद पडले की रुग्णांच्या पायांवर सूज येते (एडिमा), उदरपोकळीत द्रव जमा होते (असायटिस), रक्ताच्या उलट्या होतात आणि मानसिक गोंधळ उडतो.
हिपॅटायटीस सी चे निदान कसे केले जाते?
रक्ताच्या साध्या चाचण्या करून हिपॅटायटीस सी चे निदान करता येते. विशेष चाचण्यांतून रुग्णाच्या रक्तातील विषाणूचे प्रमाण समजते. यकृताच्या कार्याची चाचणी आणि अल्ट्रासाऊंड स्कॅन केल्यावर यकृताच्या स्थितीचे बारकाईने मूल्यांकन होते. फायब्रोस्कॅन नावाचे एक विशेष स्कॅन आजाराची तीव्रता आणि सिऱ्हॉसिसच्या पातळीपर्यंत आजारा पोहोचला आहे का ठरवते. कधीकधी यकृताची बायॉप्सी करावी लागू शकते.
तुम्हाला हिपॅटायटीस सी चे निदान झाल्यास तुम्ही काय करावे?
हिपॅटायटीस सी च्या उपचारांसाठी तुम्ही यकृताच्या आजारावरील तज्ज्ञांशी बोलावे. नवीन विषाणूरोधी औषधांच्या उपलब्धतेमुळे उपचार खूपच सोपे झाले आहेत. तुमचा/ची जोडीदार आणि जवळच्या कुटुंबियांची सुद्धा हिपॅटायटीस सी ची चाचणी करून घ्यावी.
हिपॅटायटीस सी वर उपचार कसे केले जातात?
एचसीव्ही संक्रमणावर प्रभावी उपचार आहेत –
थेट कार्य करणारी विषाणू-रोधी औषधे (डीएए) – या नवीन औषधांमध्ये सोफोस्बुविर, डाक्लाटास्विर आणि लेडिपास्विर यांचा समावेश होतो.
उपचारांनंतर तीन महिन्यांमध्ये बहुतांश रुग्ण बरे होतात. ज्या रुग्णांचा आजार वाढलेला असतो किंवा ज्यांच्यावर पूर्वी उपचार अपयशी झाले आहेत त्यांना ६ महिन्यांपर्यंत उपचार घ्यावे लागू शकतात. अशा उपचार पद्धतींनी ९० टक्के रुग्ण बरे होतात. अगदी ज्या रुग्णांवरील उपचार पूर्वी अपयशी झाले आहेत किंवा ज्यांचा यकृताचा आजार खूपच बळावला आहे त्यांनाही प्रभावीपणे बरे करता येते.
हिपॅटायटीस सी आणि यकृत बंद पडलेल्या रुग्णांवर कसे उपचार केले जातात?
एचसीव्ही असलेल्या रुग्णांचा आजार वाढून सिऱ्हॉसिस आणि यकृत बंद पडण्याच्या स्थितीला पोहोचतो तेव्हा औषधांनी त्यांच्यावर उपचार करणे शक्य नसते. अशा रुग्णांना केवळ यकृताच्या प्रत्यारोपणाचाच पर्याय असतो. एकंदर, हिपॅटायटीस सी झालेल्या १० टक्के रुग्णांना प्रक्रिया आवश्यक असते. नवीन यकृताला हिपॅटायटीस सी चे संक्रमण होण्याची जोखीम असतेच परंतु आधुनिक विषाणूरोधी औषधांनी त्यावर सहज उपचार करता येतात.
हिपॅटायटीस सी चा प्रसार रोखण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग काय आहे?
एचसीव्हीला प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही लस नाही. एचसीव्हीचा प्रसार रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संक्रमण झालेल्या रक्ताचा थेट संपर्क टाळणे.
- आरोग्यसेवा प्रदाता स्वच्छ आणि निर्जंतुक उपकरण वापरत आहेत आणि इंजेक्शनच्या सुयांचा पुनर्वापर केला जात नाही याची खात्री करा.
- दिले जाणारे रक्त अधिकृत खाजगी/ शासकीय रक्त पेढीतूनच आणले असल्याची खात्री करा.
- सुरक्षित शारीरिक संबंध ठेवा.
- टॅटू, कान व नाक टोचण्यासाठी स्वच्छ सुया व उपकरणे वापरा.
- टूथब्रश, रेझर किंवा इतर वैयक्तिक वस्तू परस्परांच्या वापरणे टाळा.
हिपॅटायटीस सी – एका दृष्टीक्षेपात वस्तुस्थिती
- हिपॅटायटीस सी हा एचबीव्हीमुळे (हिपॅटायटीस सी विषाणू) होणारा यकृताचा आजार आहे.
- एचसीव्हीचा प्रसार संक्रमण झालेल्या रक्ताचा थेट संपर्क झाल्यामुळे होतो.
- सुमारे ०.५ ते १ टक्के लोकसंख्या एचसीव्ही पॉझिटिव आहे
- एचसीव्ही असलेल्या बहुतांश लोकांमध्ये कोणतीही लक्षणे नसतात.
- रक्ताची साधी चाचणी करून एचसीव्ही चे निदान करता येते.
- एचसीव्ही वाढून यकृताचा सिऱ्हॉसिस होतो आणि यकृत बंद पडते.
- एचसीव्ही मुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो.
- औषधोपचार करून एचसीव्ही वर प्रभावीपणे उपचार करता येतात.
- हिपॅटायटीस सी ला प्रतिबंध करण्यासाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही.